Student Bus Pass: विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी!! एसटी पास थेट शाळेतच मिळणार; वेळ आणि त्रास वाचणार

Student Bus Pass: राज्यातील शाळा व महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांसाठी एसटी प्रवास पास मिळवण्याची प्रक्रिया आता अधिक सुलभ होणार आहे. एसटी महामंडळाने नवीन निर्णय घेतला असून, यानुसार प्रवास पास थेट विद्यार्थ्यांच्या शिक्षण संस्थांमध्येच वितरित केले जाणार आहेत. त्यामुळे पास मिळवण्यासाठी एसटी डिपो किंवा इतर केंद्रांवर जाण्याची गरज भासणार नाही. परिणामी विद्यार्थ्यांचा वेळ वाचणार असून, अनावश्यक गर्दीही टळणार आहे. परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे प्रमुख प्रताप सरनाईक यांनी स्थानिक अधिकाऱ्यांना यासाठी आवश्यक निर्देश दिले आहेत.




Student Bus Pass

नवीन शैक्षणिक सत्राच्या पार्श्वभूमीवर राज्यातील शाळा १६ जूनपासून पुन्हा सुरू होत आहेत. अनेक विद्यार्थ्यांना त्यांच्या निवासस्थानापासून शिक्षण संस्थेपर्यंत पोहोचण्यासाठी एसटी बसची मदत घ्यावी लागते. सरकारकडून या विद्यार्थ्यांना प्रवासात सुमारे ६६.६६ टक्के दराने सवलत दिली जाते, त्यामुळे विद्यार्थ्यांना फक्त उर्वरित ३३.३३ टक्के भरणा करून मासिक पास मिळतो.

त्याचबरोबर पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर योजनेअंतर्गत बारावीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या मुलींना संपूर्णपणे विनामूल्य प्रवास पास उपलब्ध करून दिला जातो. या नव्या उपक्रमांतर्गत शाळा आणि महाविद्यालयांनी आपल्या संस्थेतील विद्यार्थ्यांची संपूर्ण नोंद एसटी विभागाला सादर करायची आहे. त्या आधारावर एसटीचे कर्मचारी शिक्षण संस्थांमध्ये जाऊन थेट विद्यार्थ्यांच्या हातात पास वितरित करतील.




या बदलामुळे विद्यार्थ्यांना पास मिळवण्यासाठी स्वतंत्र वेळ काढण्याची किंवा केंद्रांवर गर्दी करून थांबण्याची गरज राहणार नाही. परिणामी त्यांचा अभ्यासाचा वेळ वाचणार असून, शिक्षणात अडथळा येणार नाही. या पार्श्वभूमीवर ‘एसटी पास थेट तुमच्या शाळेत’ ही विशेष मोहीम १६ जूनपासून संपूर्ण राज्यात राबवण्यात येणार आहे.

यापूर्वी एसटी डिपोंच्या व्यवस्थापकांनी सर्व शाळा व महाविद्यालयांच्या प्रमुखांना संपर्क करून नव्या शैक्षणिक वर्षात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांची यादी तयार ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. या उपक्रमाचा लाभ राज्यभरातील हजारो विद्यार्थी व विद्यार्थिनींना होणार असून, हा बदल अत्यंत उपयुक्त ठरणार आहे, असा विश्वास परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केला आहे.

विद्यार्थ्यांची अडचण कमी होणार

यापूर्वी विद्यार्थ्यांना प्रवास पास मिळवण्यासाठी एसटीच्या पास केंद्रांवर जाऊन लांब रांगेत थांबावे लागायचे किंवा संख्येनुसार गट तयार करून थेट आगारात जाऊन पास घ्यावा लागायचा. या प्रक्रियेमुळे त्यांचा मौल्यवान वेळ वाया जात होता. ही अडचण दूर करण्यासाठी एसटी प्रशासनाने आता पुढाकार घेत एक नवा उपाय योजला आहे.




मित्रांना शेअर करा:

Leave a Comment

error: Content is protected !!