खुशखबर – 15 हजार शिक्षकांची भरती करण्याचा निर्णय!!
शिक्षक भरतीसाठी (Teacher Recruitment) मे महिन्यात सीईटी (CET) घेण्यात येणार आहे. त्यामुळे शिक्षक भरतीच्या प्रतीक्षेत असलेल्या टीएटी पास धारकांना मोठा दिलासा मिळणार आहे. शिक्षण खात्याने राज्यात सहावी ते आठवीसाठी 15 हजार जागा भरती करण्याचा निर्णय घेतला असून याबाबतची अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे शिक्षक भरतीसाठी सीईटी कधी होणार याची उत्सुकता टीईटीत पास झालेल्या परीक्षार्थीना लागून राहिली आहे.
मात्र शिक्षण खात्याने दहावी व बारावीची परीक्षा झाल्यानंतर सीईटी घेण्याचा निर्णय घेतला असून बारावीची परीक्षा मेच्या दुसऱ्या आठवड्यात संपणार आहे. त्यामुळे मे महिन्याच्या अखेरीस सीईटी होण्याची शक्यता आहे. सीईटी झाल्यानंतर गुणवत्तेनुसार शिक्षकांची भरती होणार असून सीईटी चे लवकरच वेळापत्रक जाहीर होणार आहे. वेळापत्रक जाहीर झाल्यानंतर परीक्षार्थींना ऑनलाइन ऑनलाइन अर्ज दाखल करावे लागणार आहेत.
उच्च प्राथमिक विभागासाठी राज्यात 15 हजार शिक्षकांची भरती करण्यात येणार आहे. त्यासाठी येत्या आठवडाभरात सामायिक प्रवेश परीक्षा अर्थात् सीईटीची तारीख जाहीर होण्याची शक्यता आहे.
बी. एड.पदवीधारकांसाठी ही भरती असेल. नियोजित वेळापत्रकानुसार ही भरती लवकर झाली तर 2022-23 या शैक्षणिक वर्षात कार्यरत असलेल्या शिक्षकांवरील ताण कमी होणार आहे. कोरोना, आर्थिक चणचण अशा अनेक कारणांमुळे 2018 नंतर शिक्षक भरतीसाठी आवश्यक सीईटी घेण्यात आलेली नाही. त्यामुळे राज्यातील रिक्त पदांची संख्या तब्बल 15 हजारांवर पोचली आहे. त्यामुळेच शिक्षकांची रिक्त पदे भरण्याचा निर्णय शिक्षण खात्याने घेतला आहे.
डी.एड. धारकांवर अन्याय
राज्यात शिक्षक भरतीला चालना मिळाली आहे. मात्र विषय शिक्षकांची भरती होत असल्याने केवळ बी. एड, धारकांनाच शिक्षक होण्याची संधी मिळाली आहे. पहिली ते पाचवीपर्यंत रिक्त झालेल्या शिक्षकांच्या जागांवर डी. एड. धारकांची नेमणूक करण्यात येते. मात्र ही भरती तूर्त तरी होणार नाही. त्यामुळे यावेळीही डीएडधारकांवर अन्याय होणार आहे. पहिली ते पाचवीपर्यंत शिक्षक भरती करण्यासाठीही सीईटी लवकर घ्यावी, अशी मागणी डीएडधारक करु लागले आहेत.